नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण असून पुन्हा एकदा नोटाबंदीप्रमाणे आपल्याला रांगेमध्ये उभे राहून आपल्या पुर्वजांची नागरिकता सिद्ध करावी लागणार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
देशभरामध्ये सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सरकार विद्यार्थांवर दडपशाही करत असून काँग्रेस पक्ष सरकारच्या या नितीचा निषेध करतो. लोकशाहीमध्ये लोकांना आवाज उठविण्याचा, निषेध करण्याचा अधिकार आहे. नागरिकांचे ऐकणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने भाजप लोकांचे आवाज ऐकत नाही. काँग्रेस भाजपच्या या निताचाविरोध करत असून भारतीय नागरिकांच्या पाठीशी आहे, असे सोनिया म्हणाल्या.