तिरुवनंतपुरम - केरळमधील मलाप्पूरम येथील एका चार महिन्यांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोझीकोड येथील वैद्यकीय रुग्णालयात आज सकाळी बाळाचा मृत्यू झाला. गुरुवारी बाळाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
बाळावर गेल्या 3 महिन्यांपासून हृदयाशी संबंधित समस्येवर उपचार सुरू होते. तसेच त्याला न्यूमोनियाही झाल्याचे मलप्पुरम जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
चंदीगड येथील एका सहा महिन्यांच्या बाळाचाही गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. 9 एप्रिलला बाळाला पीजीआयएमआरमध्ये दाखल करण्यात आले होते. तर 21 एप्रिलला त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अखेर आज सकाळी या बाळाने शेवटचा श्वास घेतला.
यापूर्वी दिल्ली येथील अवघ्या दीड महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजशी जोडलेल्या कलावती सरन रुग्णालयातील अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत हा कोरोनाचा सर्वाधिक लहान वयाचा बळी ठरला आहे.