मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगातील ९१ लाख ८५ हजार २२९ जणांना याची बाधा झाली आहे, तर ४ लाख ७४ हजार २३७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४९ लाख २१ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. या यादीत ब्राझील आणि रशियानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. अमेरिकेमध्ये २३ लाख ८८ हजार १५३ रुग्ण, ब्राझीलमध्ये ११ लाख ११ हजार ३४८ रुग्ण, तर रशियामध्ये ५ लाख ९२ हजार २८० रुग्ण आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाख ४० हजार २१५ वर आहे. जर अॅक्टिव्ह रुग्ण संख्येचा विचार केल्यास भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
चीनच्या वुहान शहरात सुरुवातीला कोरोना वेगाने पसरला. त्यानंतर चीन शासनाने केलेल्या उपाययोजनेमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात आली. पण आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. बिजिंगमधील १३ बाधितांसह नवे २२ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, चीनमध्ये सुरुवातीला पसरलेल्या कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाल्याचे चीनने सांगितले.