गांधीनगर - शनिवारी गुजरातमध्ये कोरोनाचे ९० नवीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर येथील कोरोनाबाधितांचा आकडा हा ४६८ वर पोहोचला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अहमदाबादमध्ये तब्बल तीन जणांचा बळी गेला असून राज्यात मृतांचा आकडा २२ वर पोहोचल्याचे आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव जयंती रवि यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी दोनजण हे ६५ आणि ७० वर्षाचे होते. तर, त्यांच्यातील एकजण हा मधुमेहाने ग्रस्त होता. सोबतच शनिवारी ११ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आत्तापर्यंत ४४ जण यातून बरे होऊन घरी गेल्याचेही रवी यांनी सांगितले.
राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी तपासणीकरता घेतलेल्या ९ हजार ७६३ पैकी २ हजार ४५ जणांच्या नमुन्यांची चाचणी केली. तर, शनिवारी नव्याने आढळलेल्या ९० जणांपैकी ४६ जण हे अहमदाबाद येथील असून आता अहमदाबाद जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ही २४३ वर गेली आहे. तर, दुसरीकडे बडोद्यामध्ये ३६ नवीन रुग्ण आढळले असून आनंदमध्ये ३ तर, सुरत, भावनगर, गांधीनगर, भरुच आणि छोटा उदेपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत.