नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी 'निर्भया' घटनेने देशाला हादरवले होते. तेव्हा लोकांनी महिला सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्यानंतर देशातील अशा घटनांना चाप बसेल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संचलनालयाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीने लोकांच्या या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१९मध्ये देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या तब्बल चार लाख पाच हजार ८६१ गुन्ह्यांची नोंद झाली. यांपैकी ३२ हजार ३३ घटना बलात्काराच्या होत्या. म्हणजेच, २०१९मध्ये देशात दिवसाला सरासरी ८७ बलात्कारांची नोंद झाली. यापैकी तीन हजार ६५ गुन्हे हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये घडले आहेत. उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलीस खाते किती 'सक्षमतेने' आपले काम करत आहेत, हे दाखवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.
महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी..
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ५९ हजार ८५३ घटनांची नोंद झाली. तर, राजस्थानमध्ये ४१ हजार ५५० घटनांची नोंद झाली. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून, २०१९मध्ये राज्यात ३७ हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती.