नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात लाखो कामगार अडकून पडले होते. अशा कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी १ मे पासून रेल्वे प्रशासनाने ८०० श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. या रेल्वे गाड्यांच्या मदतीने आत्तापर्यंत १० लाख कामगारांना घरी पोहोचवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
८०० पैकी सर्वाधिक रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. ज्या राज्याचे कामगार आहेत आणि ज्या राज्यातून जाणार आहेत, अशा दोन्ही राज्यांची परवानगी असेल तरच रेल्वे प्रशासन गाड्या सोडते, असेही रेल्वे अधिकारी म्हणाले.
आत्तापर्यंत आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोरम, ओडीशा, राजस्थान, तामीळनाडू, तेलंगाणा, त्रिपूरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांदरम्यान रेल्वे वाहतूक झाली आहे. प्रवाशांची तपासणी करुनच त्यांना रेल्वेत बसवले जाते. प्रवासादरम्यान त्यांना मोफत जेवण आणि पिण्याचे पाणी दिले जाते.
येत्या सोमवारपासून प्रत्येक श्रमिक रेल्वेत सतराशे कामगार पाठवण्यात येणार आहेत. सध्या १ हजार २०० कामगार या रेल्वे गाडीत असतात. तसेच कामगारांना घेऊन जाणारी रेल्वे आता तीन थांबे घेणार आहे. अगोदर या रेल्वे विनाथांबा जात होत्या. मात्र, अनेक राज्य शासनांनी विनंती केल्याने रेल्वे तीन ठिकाणी थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.