नवी दिल्ली -जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 8 राज्यांमध्ये देशातील 85 टक्के कोरोना रुग्ण आणि 87टक्के मृत्यू झाला आहे. ही माहिती शनिवारी कोरोनाविषयक मंत्रिगटाच्या 17व्या बैठकीत देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटाची 17वी बैठक शनिवारी नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे झाली. त्यात कोरोना विषाणूच्या राज्य-वार स्थितीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी स्वतंत्र केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत. या राज्यांमध्ये 15 केंद्रीय पथके राज्यांना तांत्रिक मदत देण्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.