गांधीनगर (गुजरात)- अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील श्रेय या कोविड रुग्णालयातील आयसीयू विभागाला मध्यरात्री आग लागली. या आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनीदेखील या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि अहमदाबाद महानगर पालिकेच्या महापौरांना दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अनेक खासगी रुग्णालये कोविडच्या उपचारासाठी शासनाने ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये श्रेय हॉस्पिटलचा समावेश आहे. या रुग्णालयाच्या आयसीयूत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. याचदरम्यान मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीबद्दल रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. तपासाअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. श्रेय रुग्णालयात लागलेल्या या आगीत पाच पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. तर इतर २५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.