वर्धा - जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दुपारी एका महिलेचा मृत्यूनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधित रुग्णांची संख्या 8 झाली. यासोबतच कोरोनावर मात करुत 7 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नालवाडी येथील 5 रुग्ण आहे. तसेच वीज वितरण विभागाच्या 2 कर्मचारी कोरोना मुक्त झाले. त्यांना दोन दिवस संस्थात्मक विलागलीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र खुले होताच त्यांना घरी सोडण्यात येईल.
मृत्यूनंतर आला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
महादेवपुरा येथील महिलेची प्रकृती खराब असल्याने तिला सेवाग्राम रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तिचा रात्री उशिरा मृत्यू झाला. पण खबरदारी म्हणून घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही त्यांना होते. या महिलेवर आज कोरोना मार्गदर्शक नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत्युनंतर कोरोना पॉझिटिव्ह अहवालात समितीचा ठराव अंतिम
रुग्णाचा मृत्यू कशाने झाला हे ठरविण्यासाठी एक समिती नेमली आहे. ती निर्णय घेते. या समितीत उपचार करणारे डॉक्टर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह काही सदस्यांचा समावेश आहे. ही समिती रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि लक्षणे पाहता निर्णय घेते. अद्याप या महिलेच्या मृत्यूचा निष्कर्ष ठरला नसल्याने मृत्यू कोरोना संसर्गाने, की अन्य आजराने हे कळू शकले नाही. आर्वी येथील 78 वर्षीय वयोवृद्धाचाही कोरोना अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला होता. मात्र, दुसऱ्याच कारणाने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.