हैदराबाद - येथील दोन विविध घटनेत तीन चिमुकल्यांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद व आसपासच्या भागामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत.
येथील बंडलगुडा भागात भिंत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले होते. तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना ही ईब्राहीमपट्टणम येथे घराची छत कोसळल्याने 40 वर्षीय महिला व तिच्या 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक बचाव कार्य करत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो हळूहळू दक्षिण किनारपट्टीकडे सरकत आहे. परिणामी येत्या तीन ते चार दिवसात तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रसह इतर राज्याला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
सखल भागात अशा प्रकारे पाणी साचले होते
अशा प्रकारे वाहने वाहून जात होती
दरम्यान, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. तसेच संबंधितांना सूचना केल्या आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, बंडलगुडा भागातील मोहम्मदीया हिल्स या ठिकाणी खासगी भिंत कोसळल्यने 9 जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. तुफानी वृष्टी असून सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. चंद्रयानगुट्टाचे आमदार अकबरोद्दीन ओवैसी यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांची विचारपूस केली आहे.
हैदराबादमध्ये मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. ग्रेटर हैदराबादच्या एलबी नगर भागामध्ये तब्बल 25 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही असाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून कोणीही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -हैदराबादमध्ये 'रेकॉर्ड ब्रेक' : मुसळधार पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत