महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दुसऱ्या महायुद्धाची पंच्याहत्तरी: ज्यू नागरिकांचे शिरकाण; मानवतेला काळीमा फासणारी घटना

ज्यूंची हत्या करण्यासाठी नाझी सैन्याने 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'ची निर्मिती केली होती. विविध छळछळावणीतून त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नेले जायचे. तेथे त्यांच्यावर विषारी वायूचा प्रयोग करून मारले जात असत. मात्र, बऱ्याच वेळा यात गुप्तता पाळण्यात येत असे. जर्मनीने जिंकलेल्या देशांमध्ये त्यांनी अनेक छावण्या तयार केल्या होत्या.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 2, 2020, 8:07 AM IST

हैदराबाद - दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपमध्ये सुमारे ९० लाख ज्यू धर्मीयांची लोकसंख्या होती. मात्र, युद्धातील नरसंहारात नाझी जर्मनीने सुमारे ६० लाख म्हणजेच दोन तृतीयांश ज्यूंचे शिरकाण केले. यास 'होलोकॉस्ट' असेही म्हणतात. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर नॉर्डिक वंशाचा होता. नॉर्डिक वंशाचे नागरिक सर्वश्रेष्ठ असून ज्यू हलक्या दर्जाचे नागरिक आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार नाही, अशी विचारधारा हिटलरची होती. ज्यूंबद्दल त्याच्या मनात तीव्र घृणा होती. त्यामुळे त्याने १९३९ ते १९४५ या काळात ज्यूंची मोठ्या प्रमाणात हत्या केली.

मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी वंशहत्येची घटना आहे.

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर नाझी सैन्याने घराघरांतून ज्यू नागरिकांना काढले. त्यांची संपत्ती, घरदार, मालमत्ता, नोकऱया व्यवसाय सर्व काही त्यांच्यापासून हिसकावून घेण्यात आले. फक्त जर्मनीच नाही तर युरोपातील जर्मनीने जिंकलेल्या सर्व देशांतून ज्यूंना त्याने छावणीमध्ये डांबून टाकले. यास छळछळावणी किंवा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असेही म्हणत असे. सर्व ज्यूंना छावणीमध्ये राहण्यास भाग पाडले. तेथे त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. अन्न पाण्याविना ज्यू नागरिक मरत होते. अनेकांना युद्धकाळात कंपन्यात काम करण्यास लावण्यात आले. वृद्ध महिला आणि व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

ज्यूंना मारण्यासाठी नाझी जर्मनीने अनेक युक्त्या राबविल्या. कधी त्यांना विना अन्न पाण्याचे मरेपर्यंत कामावर जुंपले जात. तर कधी केमिकलच्या गोदामात कोंडून मारले गेले. छावण्यामधील रोगराई, उपासमार, वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे अनेक ज्यूंचा मृत्यू झाला. वयोवृद्ध आणि लहान बालकेही या नरसंहारापासून वाचले नाहीत. ज्यू नागरिकांचा वापर वैद्यकीय प्रयोगासाठी किंवा युद्धाच्या सरावासाठीही केला जात असे.

ज्यूंचे शिरकाण...'होलोकॉस्ट' म्हणजे काय?

होलोकॉस्ट हा ग्रीक भाषेतील शब्द असून याचा अर्थ 'संपूर्ण भाजणे' असा आहे. एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या समुहाने वंशहत्या केल्याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. अॅडॉल्फ हिटलर ज्यू लोकांचा वंश हलक्या दर्जाचा समजत होता. जर्मन नागरिकांच्या शुद्धीकरणासाठी त्याने ज्यूंना नष्ट करण्याचा विडा उचलला. संपूर्ण युरोपातील ज्यूंना त्याने अतिशय वाईट वागणूक दिली. छावणीत असताना एखाद्याने साधी चुकही केली तरी त्याला गोळी घालून मारण्यात येत असे.

ज्यूंची हत्या करण्यासाठी नाझी सैन्याने 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'ची निर्मिती केली होती. विविध छळछळावणीतून त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नेले जायचे. तेथे त्यांच्यावर विषारी वायूचा प्रयोग करून मारले जात असत. मात्र, बऱ्याच वेळा यात गुप्तता पाळण्यात येत असे. जर्मनीने जिंकलेल्या देशांमध्ये त्यांनी अनेक छावण्या तयार केल्या होत्या. रेल्वेद्वारे तेथे सर्व ज्यूंना नेण्यात येत असे. नवीन ठिकाणी वस्ती वसविण्यासाठी त्यांना रेल्वेने नेले जात आहे. असे सुरुवातील नाझी सैन्य सांगायचे. मात्र, खरे तर त्यांना मारण्यासाठी नेले जात असे.

डखाउ, बुखनवाल्ड, आउश्वित्झ अन अशा अनेक छावण्या...

जर्मन सैन्याने ज्यूंना मारण्यासाठी अनेक ठिकाणी छळछळावण्या तयार केल्या होत्या. यातील अनेक छावण्यांचे अवशेष आजही जतन करून ठवेले आहेत. त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असेही म्हटले जात असे. तेथे सर्व बंदी बनविलेल्या ज्यूंना ठेवले जात असे. अनेक तंदुरुस्त कैद्यांना युद्धकाळात कंपन्यांमध्ये काम करण्यासही लावले जात असे. तर वयस्कर नागरिकांना मारून टाकण्याचा सपाटा सैन्याने लावला होता. अनेक जण या छावणीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत. मात्र, त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. सर्व ज्यू लोकांच्या खांद्यावर एक निशाण लावलेले होते. तसेच त्यांना ठराविक क्रमांक देण्यात आले होते. त्यानुसार त्यांची माहिती नाझी सैन्याने ठेवली होती.

सर्वात भयंकर अशी छावणी म्हणजे आउश्वित्झ. या छावणीमध्ये कैद्यांचे अतोनात हाल केले जात असत. एकतर विनाअन्न पाणी त्यांना कामावर जुंपले जात. अन्यथा गॅस चेंबरमध्ये घालून मारले जात. या सारख्या अनेक छावण्या जर्मनीने स्थापन केल्या होत्या. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सर्वांना एका ठिकाणी जमविण्याचे नियोजन होते. मात्र, १९४२ नंतर सर्वच छावण्यांमधील ज्यूंचे शिरकाण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details