बंगळुरू - कर्नाटकच्या बागलकोटमध्ये कोरनामुळे एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या चारवर पोहोचली आहे.
बागलकोटचे जिल्हा उपायुक्त के. राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने परदेशवारी केली नव्हती. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे भारतातच त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच, या व्यक्तीने 'तबलीग-ए-जमात'च्या दिल्लीमधील कार्यक्रमालाही हजेरी लावली नसल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.
यानंतर या व्यक्तीच्या मुलांचीही कोरोनासाठी तपासणी करण्यात आली. सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये कोरोनाचा पहिला बळी आढळून आला होता. देशातील कोरोनाचा हा पहिलाच बळी होता. त्यानंतर चिक्कबल्लापूरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी आढळून आला होता. तर, तुमाकुरूमध्ये तिसरा बळी आढळून आला होता. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १२८ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालायने दिली आहे.
हेही वाचा :'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रकरणात उगाच का नाक खुपसू'