नवी दिल्ली -आजच्या दिवशी देश हादवरून सोडणारी घटना घडली होती. १६ डिसेंबर २०१२ ला २३ वर्षाच्या निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृत्यू देखील झाला. आज या घटनेला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, निर्भयाचे कुटुंबीय अद्यापही न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत.
निर्भया बलात्कार प्रकरणाला ७ वर्ष पूर्ण, कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत
गेल्या १६ डिसेंबर २०१२ ला २३ वर्षाच्या निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृत्यू देखील झाला. आज या घटनेला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, निर्भयाचे कुटुंबीय अद्यापही न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत.
निर्भया बलात्कार प्रकरणाला ७ वर्ष पूर्ण
निर्भया बलात्कार प्रकरणातील घटनाक्रम
- १६ डिसेंबर २०१२ : मेडिकलची विद्यार्थीनी तिच्या मित्रासोबत रात्री खासगी बसने प्रवास करीत असताना तिच्यावर ६ जणांना सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला चालत्या गाडीतून रस्त्यावर फेकण्यात आले.
- १७ डिसेंबर २०१२ : पोलिसांनी घटनेतील ४ आरोपीचा शोध लावला. त्यामध्ये बस चालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.
- १८ डिसेंबर - पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या .
- २१ डिसेंबर २०१२ : अल्पवयीन आरोपीला दिल्लीतील आनंद विहार बस टर्मिनलजवळून पकडण्यात आले. तसेच निर्भयाच्या मित्राने मुकेश हा आरोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सहावा आरोपी अक्षय ठाकूर याला पकडण्यासाठी हरियाणा आणि बिहार मध्ये छापे टाकले.
- २२ डिसेंबर २०१२ : सहावा आरोपी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक करण्यात आली. तसेच पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला.
- २३ डिसेंबर २०१२ : दिल्लीत अनेक भागामध्ये निदर्शने करण्यात आली. त्यामध्येच दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सुभाष तोमर गंभीर जखमी झाले.
- २५ डिसेंबर २०१२ : निर्भयाची तब्येत चांगलीच खालावली होती, तर दुसरीकडे सुभाष तोमर यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.
- २६ डिसेंबर २०१२ : निर्भयाला सिंगापूर येथील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात हलवण्यात आले.
- २९ डिसेंबर २०१२ : माउंट एलिझाबेथ रुग्णालयातच रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
- २ जानेवारी २०१३ : तत्कालीन न्यायाधीश अल्तमस कबीर यांनी बलात्काराच्या घटनेच्या सुनावणीसाठी जलद गती न्यायालय सुरू केले.
- ३ जानेवारी २०१३ : पोलिसांनी ५ आरोपींविरोधात हत्या, सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण असे विविध गुन्हे दाखल केले.
- ५ जानेवारी २०१३ : आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल
- ७ जानेवारी २०१३ : कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली प्रक्रिया करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
- १७ जानेवारी २०१३ : जलत गती न्यायालयात ५ आरोपींविरोधात खटला सुरू झाला.
- २८ जानेवारी २०१३ : पाचवा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले.
- २ फेब्रुवारी २०१३ : पाचही आरोपींवर आरोप सिद्ध झाले.
- २८ फेब्रुवारी २०१३ : बाल न्यायालयाने अल्पवयीन आरोपीविरोधात बलात्कार, हत्येचे आरोप सिद्ध केले.
- ११ मार्च २०१३ : बस चालक आणि मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगामध्ये आत्महत्या केली.
- २२ मार्च २०१३ : दिल्ली उच्च न्यायालयाने मीडियाला ट्रायल कोर्टातील कार्यवाही रिपोर्ट करण्याची समंती दिली.
- ५ जुलै २०१३ : बाल न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने ११ जुलैसाठी निर्णय राखून ठेवला.
- ८ जुलै २०१३ : जलद गती न्यायालयाने खटल्यातील साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
- ११ जुलै २०१३ : १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री घटनेपूर्वी एका सुताराला बेकायदेशीर लुटल्याचा आरोप अल्पवयीन आरोपीवर लावण्यात आला.
- २२ ऑगस्ट २०१३ : उरलेल्या ४ आरोपींविरोधात जलद गती न्यायालयामध्ये अंतिम युक्तीवाद सुरू झाला.
- ३१ ऑगस्ट २०१३ : बाल न्यायालयाला अल्पवयीन आरोप बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात दोषी आढळला. त्यामुळे त्याची बालसुधारगृहात ३ वर्षासाठी रवानगी करण्यात आली.
- ३ सप्टेंबर २०१३ : जलद गती न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
- १० सप्टेंबर २०१३ : मुकेश, विनय, अक्षय आणि पवन हे चार आरोपी सामूहिक बलात्कार आणि हत्येसह १३ गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले.
- १३ सप्टेंबर २०१३ : अतिरिक्त सत्र न्यायाधीशाने चारही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात पाठवण्यात आला.
- २३ सप्टेंबर २०१३ : दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर सुनावणी सुरू केली.
- ३ जानेवारी २०१४ : उच्च न्यायालयाने खटल्याचा निर्णय राखून ठेवला.
- १३ मार्च २०१४ : दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला.
- १५ मार्च २०१४ : सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर स्थगितीचे आदेश दिले.
- १५ एप्रिल २०१४ : निर्भयाच्या मृत्यूची घोषणा न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
- १८ डिसेंबर २०१५ : दिल्ली उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यास नकार दिला.
- २० डिसेंबर २०१५ : घटनेवेळी १८ वर्ष पूर्ण व्हायला काही महिने बाकी असलेल्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्यात आले. त्यानंतर देशात जोरदार निदर्शने सुरू झाली.
- ३ एप्रिल २०१६ : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
- ८ एप्रिल २०१६ : ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन आणि संजय हगडे यांनी 'अमिकस क्युरी'(खटल्याशी संबंधीत नसलेला. मात्र, खटल्याबद्दल माहिती पुरवणार व्यक्ती)ची नेमणूक केली.
- ५ मे २०१६ : सर्वोच्च न्यायालयाने अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
- २९ ऑगस्ट २०१६ : पुराव्यासोबत छेडाछेडा केल्याचा पोलिसांवर आरोप
- ७ नोव्हेंबर २०१६ : शिक्षेचा आदेश बाजूला ठेवण्याचा युक्तीवाद वकील राजू रामचंद्रन यांनी केला.
- २८ नोव्हेंबर २०१६ : अॅड. संजय हेगडे यांनी या खटल्यातील पुराव्यांच्या विश्वासार्हतेविरूद्ध युक्तिवाद केला
- ३ फेब्रुवारी २०१७ : खटल्याच्या प्रक्रियेत काही उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.
- २७ मार्च २०१७ : या खटल्याच्या सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
- ५ मे २०१७ : फाशीच्या शिक्षेला आवाहन देणारी आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
- १३ नोव्हेंबर २०१७ : आरोपींनी शिक्षेचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल केली.
- ४ मे २०१८ : आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
- ९ जुलै २०१८ : सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली. चौथा आरोपी अक्षयने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती.
- १० डिसेंबर २०१९ : आरोपी अक्षय सिंहने सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली.
- १७ डिसेंबर २०१९ : आरोपी अक्षय सिंहच्या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायाधीश आर बानूमती आणि न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
Last Updated : Dec 16, 2019, 9:58 AM IST