नवी दिल्ली- देशभरातील कोरोनाच्या बळींमध्ये ६४ टक्के पुरुषांचा, तर ३६ टक्के महिलांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या एका अहवालामध्ये ही बाब समोर आली आहे.
वयोमानानुसार केलेले वर्गीकरण पाहता; एकूण बळींपैकी ०.५ टक्के हे १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, २.५ टक्के हे १५ ते ३० वयोगटातील आहेत, ११.४ टक्के हे ३० ते ४५ वयोगटातील आहेत, ३१.१ टक्के हे ४५ ते ६० वयोगटातील आहेत, तसेच ५०.५ टक्के लोक हे ६०पेक्षा अधिक वयोगटातील आहेत.
यासोबतच या अहवालामध्ये हे समोर आले आहे, की एकूण बळींच्या ७३ टक्के लोकांना कोरोनाव्यतिरिक्त दुर्धर आजारांनीही ग्रासले होते. वयोवृद्ध व्यक्ती आणि अशा प्रकारचे आजार असणारे व्यक्ती यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३,४३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अॅक्टिव्ह असलेल्या ६३,६२४ रुग्णांपैकी २.९४ टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण ४५,२९९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :नवी मुंबई अन् सूरतसह सहा शहरे 'कचरामुक्त'; केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची घोषणा