अलवर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील चतरपूरा गावामध्ये ही घटना घडली आहे.
राजस्थानमध्ये मोहन भागवतांच्या ताफ्यामुळे मोठा अपघात; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू - अलवर न्यूज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. यात एका बालकाचा मृत्यू झाला.
मोहन भागवत आपल्या जन्मदिवसानिमित्त अलवर येथील बाबा कमलनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी परतताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. हरसोली मुंडावर रस्त्यावर सरपंच चेतराम यांच्या दुचाकीला मोहन भागवत यांच्या ताफ्याने धडक दिली. या अपघातामध्ये चेतराम यांचा नातू सचिनचा मृत्यू झाला. तर चेतराम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यापुर्वी मे महिन्यामध्ये मोहन भागवत यांच्या ताफ्यामुळे एका गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी गाडीचे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. त्यावेळी मोहन भागवत महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून नागपूरला परतत होते.