नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देश पाचव्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या टप्प्यात ७ राज्यातील ५१ लोकसभा मतदार संघांसाठी ६ मे ला मतदान होईल. यामध्ये एकूण ६७४ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार तब्बल १४ टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. त्यावर एक नजर...
पाचव्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ६७४ उमेदवारांपैकी ६६८ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या ६ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ६७४ उमेदवारांपैकी १४९ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत. तर, ३१ उमेदवार हे स्थानिक पक्षांतील आणि २३६ मान्यता प्राप्त नसलेले मात्र नोंदणीकृत पक्षातील आहेत.
एडीआरने या गुन्ह्यांचे ८ भागात वर्गिकरण केले आहे. त्यावरुन त्यांनी उमेदवारांची टक्केवरी ठरवली. यात सामान्य गुन्हे, गंभीर गुन्हे आणि दोषसिद्ध झालेले उमेदवार, हत्या, हत्येचा प्रयत्न करणारे आणि अपहरणाचा आरोप असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय यात महिलांवर अत्याचार करणारे आणि उग्र भाषण करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे.
गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांची संख्या -
पाचव्या टप्प्यामध्ये रिंगणात असलेल्या ६६८ उमेदवारांपैकी ९५ उमेदवार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकूण १४ टक्के उमेदवार, असे आहेत की त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. अजामीनपात्र गुन्हे.
३. निवडणुकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजिन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असेलेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.
सामान्य गुन्हे दाखल असणारे उमेदवार -उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार ६६८ उमेदवारांपैकी १२६ उमेदवारांनी आपल्यावर सामान्य गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच पाचव्या टप्प्यातील १९ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.
दोष सिद्ध झालेले उमेदवार - ६ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. म्हणजेच रिंगणात उभे ०.८९ टक्के उमेदवारांवर विविध गुन्ह्यामध्ये दोष सिद्ध झाले आहेत.
हत्येशी संबंधीत उमेदवार - पाचव्या टप्प्यातील ६६८ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांवर हत्येचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच त्यांच्यावर भादंवि कलम ३०२ उंतर्गत गुन्हे दाखल आहेत.