भोपाळ : नागपूर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करत मध्य प्रदेशमधील इंदूर पोलिसांनी एका मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक केली आहे. आरोपी मूळ नेपाळचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरमधील अपहरण झालेल्या चिमुरड्याला इंदूर पोलिसांनी वाचवले; अपहरणकर्ता ताब्यात याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फारुख खान असे अपहरणकर्त्याचे नाव आहे. ५५ वर्षांचा फारुख हा नागपूरच्या एका फर्नीचर कंपनीमध्ये काम करत असे. काही दिवसांपूर्वी त्याने फुटपाथवर राहणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलाशी मैत्री केली होती. तो दररोज त्या मुलाला दूध-बिस्कीट देत असे. असे करत त्याने त्या मुलाचा विश्वास संपादन केला आणि एक दिवस तो या मुलाला घेऊन पळून गेला.
यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून त्याची लोकेशन पाहिली असता, फारुख इंदूरला असल्याचे समजले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी इंदूरच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यानुसार कारवाई करत इंदूर पोलिसांनी फारुखला ताब्यात घेत, त्याच्या तावडीतून चिमुकल्याची सुटका केली आहे. यानंतर आता इंदूर पोलीस या मुलाला नागपूर पोलिसांकडे सुपूर्द करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :गेल्या सहा महिन्यांमध्ये भारत-चीन सीमेवर घुसखोरीची एकही घटना नाही; केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती