लखनऊ (उत्तर प्रदेश) - 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) कथित कट्टरपंथी गटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून चौघांना सोमवारी मथुरा येथे अटक करण्यात आली. ते दिल्लीहून हाथरसला जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.
मथुराच्या मठ टोल प्लाझा येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. येथून काही संशयित लोक दिल्लीहून हाथरसकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस वाहनांची तपासणी करत होते. हे चौघे एका कारमध्ये होते आणि त्यांनी अतीक-उर रहमान (मुझफ्फरनगर), सिद्दीक (मलप्पुरम), मसूद अहमद (बहराइच) आणि आलम (रामपूर) अशी नावे आणि पत्ते सांगितले. शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर काही साहित्य जप्त केले. चौकशीदरम्यान, त्यांचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याची सहयोगी संस्था कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाशी (सीएफआय) संबंध असल्याचे पोलिसांना समजले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -धक्कादायक! बलात्कारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकत पेटवले