जयपूर -राजस्थानातील जोधपूर शहरातल्या उमीद रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. औषध वापराची तारीख संपलेले म्हणजेच एक्सपायर झालेले ग्लुकोज सलायनद्वारे चार बालकांना देण्यात येत होते. या प्रकरणी वैद्यकीय विभागाने तपास सुरु केला आहे.
मेंदुज्वराने आजारी असलेल्या चार बालकांना उमीद रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चेतापेशींची सूज कमी करण्यासाठी ग्लुकोज सलायनद्वारे त्यांना इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, या ग्लुकोज बाटल्यांचा वापराचा अवधी संपूण गेला होता. तरीही मुलांच्या जीवाशी खेळ सुरु होता.
रुग्णालयातील वैद्यकीय निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर सरकारच्या औषध विभागाने पुरावे गोळा केले आहेत. या रुग्णालयातील स्टोअरमध्येसुद्धा गलथान कारभार सुरु असल्याचे उघड झाले आहे. तारीख संपलेली काही इंजेक्शने स्टोअर रुममध्ये आढळून आली आहेत.
या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 3 दिवसांच्या आत याचा अहवाल जमा करण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेस जबाबदार नर्स आणि स्टोअर कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
कोणतेही औषध देण्याआधी वापराची तारीख तपासणे परिचारीकेचे काम आहे. मात्र, कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालयाची विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेत. चौकशी समिती तयार करण्यात आली असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रंजना देसाई यांनी सांगितले.