जोधपूर -राजस्थानच्या अजमेरमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी या मेळाव्यात दाखल झाले आहेत. उंट आणि घोड्यांच्या कितीतरी उंची प्रजाती या मेळाव्यात दिसून येत आहेत. मात्र, या सर्वामध्ये लोकांच्या आकर्षणाचा भाग झालाय 'भीम' नावाचा एक रेडा!
'लँबॉर्गिनी', 'फरारी'पेक्षाही महाग आहे हा रेडा.. तब्बल १३०० किलो वजन असलेल्या 'भीम' रेड्याची किंमतही तशीच मोठी आहे. विदेशी स्पोर्ट्सकार्सनाही लाजवेल अशी याची किंमत आहे. एका लँबॉर्गिनी किंवा फरारीची किंमत ही साधारणपणे चार ते पाच कोटी, किंवा जास्तीत जास्त दहा कोटी असते. तर, 'भीम'ची किंमत आहे, तब्बल १५ कोटी रुपये! विशेष म्हणजे, भीमला या मेळाव्यात विकण्यासाठी नाही, तर केवळ प्रदर्शनासाठी आणले गेले आहे.
खास रेड्यासाठी आहे खास डाएट!
'भीम'चे मालक अरविंद जांगिड हे जोधपूरचे राहणारे आहेत. अरविंद यांनी सांगितले, की मुर्रा प्रजातीचा असलेल्या भीमची लहानपणापासूनच विशेष काळजी घेण्यात आली. डाएटिशियन्सच्या सांगण्यावरून त्याला रोज २० किलो दूध आणि १ किलो लापशी दिली जाते. भीमचे १३०० किलो वजन हे मेंटेन ठेवले जाते. जास्त वजन वाढणे हे भीमच्या आरोग्यासाठी चांगले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
वीर्याची होते विक्री..
अरविंद यांनी सांगितले, की 'भीम'च्या वीर्याची ते या मेळाव्यामध्ये विक्री करत आहेत. इतर पशुपालकांनी त्याचा वापर करून आपल्या प्राण्यांची प्रजाती सुधारावी, या हेतूने ते ही विक्री करत आहेत. त्यांनी सांगितले, की बाजारात भीमच्या नावाने नकली वीर्यही विकले जाते. त्यामुळे भीमचे वीर्य हे आपण थेट आपल्या मार्फतच विकत आहोत.
हेही पहा :VIDEO: मूल होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगातही सुरु आहे 'अशी' परंपरा, डोके सुन्न होईल हे पाहून