नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभराच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून आज भारतात परतले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना मोदींनी तीन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. 'तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. लष्कराच्या जवानांनी भारताची मान उंचावली होती. मी त्या शूरवीर जवानांना नमन करतो,' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - टेक्सासमध्ये शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
पंतप्रधान मोदींनी उद्यापासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्याही देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच अमेरिकेत राहणाऱ्या सगळ्या भारतीयांचेही त्यांनी आभार मानले. न्यूयॉर्क आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत जगभरातल्या नेत्यांसह भेटी घेतल्या.
'2014 मध्ये मी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलो होतो आणि आताही गेलो होतो. दोहोंमधला फरक मला जाणवला. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. जगभरात भारताविषयी आदर भावना वाढली आहे,' असे मोदी म्हणाले. त्यांनी विमानतळावर स्वागतासाठी आलेल्यांचेही आभार मानले.
हेही वाचा - काश्मीरमधील मुस्लिमाची काळजी पण चीनमधल्या मुस्लिमांचं काय?, अमेरिकेचा पाकिस्तानला प्रश्न