नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. शहरातील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या 29 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, लॅब टेक्नीशियन या संसर्गाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास दिल्ली सरकार त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई देणार आहे.
कोरोनामुळे जोपर्यंत नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तोपर्यंत सरकार सर्व दिल्लीकरांना अन्नधान्य पुरवणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले होते. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 2 हजार 918 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील 877 जण उपचारानंतर बरे झाले असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरामध्ये 27हजार 892 कोरोना प्रकरण असून त्यामध्ये 20 हजार 835 अॅक्टीव केसेस आहेत. तर 6 हजार 184 जण उपचारानंतर बरे 872 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.