बंगळुरू - कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकांसाठी २४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी १२८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत २४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर, उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
१५ जागांवरती होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये तिहेरी लढत होणार आहे.
कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.