महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन : आपल्या समस्यांवरील उपाय निसर्गात आहेत - हवामान बदल न्यूज

भारतातील सर्वाधिक जैव विविधता हिमालय, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पश्चिम घाटात आढळते. गेल्या काही दशकांमध्ये भारतातील कमीत कमी अर्धी जंगले संपवण्यात आली आहेत. तसेच, येथील 70 टक्के जलसाठे प्रदूषित झाले आहेत. शिवाय, जंगलतोड झालेल्या बहुतेक जमिनीवर बांधकामे किंवा शेती आहे. खरं तर, आताच्या क्षणी आपण जैव विविधतेतील आधीच किती प्रजाती गमावल्या आहेत, हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही.

international day for biological diversity
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन : आपल्या समस्यांवरील उपाय निसर्गात आहेत

By

Published : May 22, 2020, 11:45 AM IST

जैव विविधता संसाधने मानवी जीवन, विकास आणि समाजबांधणीतील महत्त्वाचे स्तंभ आहेत. मासे सुमारे 3 अब्ज लोकांना प्राण्यांमधील 20 टक्के प्रोटीन (अ‌ॅनिमल प्रोटीन) देतात. मानवी आहारापैकी 80 टक्क्यांहून अधिक झाडे आणि वनस्पतींकडून पुरवला जातो. विकसनशील देशांमधील ग्रामीण भागात राहणारी 80 टक्के जनता मूलभूत आरोग्यासाठी पारंपारिक वनस्पतीजन्य औषधांवर अवलंबून आहेत.

दर वर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन साजरा केला जातो. हा दिवस जैविक संसाधनांचे संरक्षण आणि आपल्या पर्यावरणाला आकार देणारी जागतिक जैवविविधता यांचे महत्त्व याविषयी जगभरात जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.

जैव विविधता म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्यातील विविधता असे समजले जाते. परंतु, प्रत्येक प्रजातीमध्ये अनुवांशिक फरक देखील असतो - उदाहरणार्थ, पिकांच्या जाती आणि पशुधनांच्या जाती. तसेच, मानव, वनस्पती, प्राणी अशा निसर्गातील विविध घटकांचा एकमेकांशी परस्परसंबंध, संपर्क घडवून आणणाऱ्या पर्यावरणातील विविध परिसंस्था (तलाव, जंगल, वाळवंट, शेतजमिनी) यांचाही जैव विविधतेत समावेश होतो.

2020 संकल्पना (थीम) : आपल्या समस्यांवरील उपाय निसर्गात आहेत

“ही जीवनशैली आहे, जी विकसित होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागली. इतक्या वर्षांत यातील विविध घटकांच्या गुणसूत्रांमध्ये अक्षरशः वादळी बदल घडून आले. ते सर्व आपल्या पोटात सामावून घेत निसर्गातील विविध घटकांची निर्मिती झाली. यातूनच हे जग निर्माण झाले ज्यामधून आपली निर्मिती झाली. या जैविविधतेमुळे जग स्थिर राहते. ”

- ई. ओ. विल्सन (एक अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, निसर्गशास्त्रज्ञ आणि लेखक)

जगातील सर्व लोक निसर्गापासून वेगळे असण्याऐवजी निसर्गाचाच भाग आहेत, असे या संकल्पनेतून दर्शवले आहे. यातून परिस्थिती चांगली होण्याची आशा, एकता आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला आहे.

आपण अनेक प्रकारची तांत्रिक प्रगती केलेली असूनही आजही आपल्या पाणी, अन्न, औषधे, कपडे, इंधन, निवारा आणि उर्जा याकरिता आपण पर्यावरणीय व्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून आहोत.

अंदाजे 44 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीच्या उत्पादने आणि सेवांच्या निर्मितीसाठी आपण आजही निसर्गावर आणि त्यातून मिळणाऱ्या विविध बाबींवर काही प्रमाणात किंवा पूर्णपणे अवलंबून आहोत. हे मूल्य संपूर्ण जगाच्या जीडीपीच्या अर्ध्याहून अधिक आहे. बांधकाम, शेती, अन्न आणि पेये हे तीन मोठे उद्योग आहेत जे बहुतांशी निसर्गावर अवलंबून आहेत.

गरीबीत राहणाऱ्या कोट्यवधी लोकांपैकी 70 टक्क्यांहून अधिक लोक शेती, मासेमारी, वनीकरण किंवा इतर निसर्गावर आधारित उद्योगांद्वारे आपला उदरनिर्वाह करतात. यासाठी ते नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत.

नुकताच कोविड -19 (कोरोनाव्हायरस) सारख्या साथीच्या रोगाचा विळखा जगावर पडला आहे. यामुळे खरं तर, आपल्याला पुन्हा एकदा मानवजातीच्या इतिहासात जैव विविधतेने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी विचार करण्याची वेळ आली आहे. शिवाय, यामधून बाहेर पडण्यात वर्तमानात जैव विविधता बजावत असलेल्या संरक्षणात्मक भूमिकेचा पुनर्विचार करण्यास आपल्याला भाग पडले आहे. शिवाय, भविष्यातही जैव विविधतेच्या या भूमिकेची सर्व मानवजातीला गरज आहे. यातील संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण हा एक मूलभूत फायदा आहे.

जैवविविधतेच्या नुकसानामुळे 'झुनोसिस'ची संख्या वाढू शकते, असे सूचित करणारे पुरावे आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होणारे रोग'.

खरं तर, अलीकडच्या काही वर्षांत संसर्गजन्य रोगांपैकी 70% आजार 'झुनोसिस'मुळे उद्भवले आहेत. कित्येक प्रजाती बहुतेक वेळा संक्रमणाच्या प्रसारामध्ये सामील असतात. त्यापैकी अनेक प्रजातींची जैवविविधता नष्ट होणे आणि नामशेष होण्यामुळे रोगकारके मानवापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच, डब्ल्यूएचओ आपल्याला संभाव्य अनपेक्षित परिस्थितीची तयारी करण्यास सांगत असतानाही, शास्त्रज्ञांनी जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्था टिकवण्याचा आग्रह धरला आहे. तसेच, या परिसंस्था निरोगी, कार्यशील आणि यातील विविध प्रजातींनी युक्त असल्या पाहिजेत. अशा परिसंस्था आपल्या सर्वांच्या आजूबाजूला असल्यामुळे केवळ मानवजातीचेच भले होईल, असे नसून हे आपल्या 'पृथ्वी' या संपूर्ण ग्रहाच्या स्थिरतेसाठी हे सर्वाधिक आवश्यक आहे.

हवामान बदल हा जैवविविधतेस मोठा धोका

जैवविविधतेने संपन्न असलेल्या 17 देशांपैकी भारत एक आहे. जगात आतापर्यंत नोंद झालेल्या विविध प्रजातींपैकी 7 ते 8 टक्के भारतात आहेत.

भारतातील सर्वाधिक जैव विविधता हिमालय, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पश्चिम घाटात आढळते. गेल्या काही दशकांमध्ये भारतातील कमीत कमी अर्धी जंगले संपवण्यात आली आहेत. तसेच, येथील 70 टक्के जलसाठे प्रदूषित झाले आहेत. शिवाय, जंगलतोड झालेल्या बहुतेक जमिनीवर बांधकामे किंवा शेती आहे. खरं तर, आताच्या क्षणी आपण जैव विविधतेतील आधीच किती प्रजाती गमावल्या आहेत, हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यातल्या त्यात भारतीय चित्ता (अ‌ॅसीनॉनेक्स ज्युबॅटस) आणि गुलाबी डोके असलेले बदक (र्‍होडोनेस्सा कॅरिओफिलिसे) ही नामशेष झालेल्या प्रजातींपैकी काही वारंवार उल्लेख होणारी नावे आहेत आणि अनेकांना ती परिचित आहेत.

अशा बर्‍याच प्रजाती जगभरात आहेत, ज्यांनी आधीपासूनच कधीही भरून न येणारे नुकसान भोगले आहे आणि इतर काही प्रजाती लवकरच असे परिणाम होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

  • दर तासाला तीन प्रजाती गायब होतात
  • दररोज 100 ते 150 प्रजाती नामशेष होतात.
  • दरवर्षी 15 हजार ते 80 हजार प्रजाती नष्ट होतात.
  • हवामानातील बदलामुळे कॅनडामधील ध्रुवीय अस्वलांची संख्या गेल्या तीस वर्षांत 22% घटली आहे. दोन्ही ध्रुवांवरील बर्फाच्या वितळण्यामुळे या प्राण्यांसाठी शिकार मिळणे कठीण होते. किंवा काही वेळेस बर्फाचे पाणी झाल्यामुळे त्यांना भक्ष्यापर्यंत प्रवास करण्यासाठी पोहून पार करावे लागणारे अंतर वाढते. इतके पोहणे अशक्य असल्याने या प्राण्यांना अन्नापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.
  • जागतिक तापमानवाढीमुळे वारंवार दुष्काळ, जमिनीत वाढता कोरडेपणा अशा पर्यावरणीय बदलांमुळे क्लॉड जंगली बेडकाच्या 74 प्रजाती आधीच नष्ट झाल्या आहेत.
  • अंटार्क्टिकामधील अ‍ॅडली पेंग्विनची लोकसंख्या गेल्या वीस वर्षांत 320 जोड्यांवरून 54 जोड्यांपर्यंत कमी झाली.
  • नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या फ्लायकॅचर या पक्ष्याच्या प्रजातीची संख्या मागील काही दशकांत 90 टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. हवामानातील बदलामुळे या पक्ष्यांना त्यांचे अन्न मिळणे कठीण बनणे हेच याचे कारण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details