बलरामपूर -उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दोन दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संशयास्पद कारवाईमुळे हे प्रकरण आणखी चिघळले. आता बलरामपूरमधून आणखी एका सामूहिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे.
युपी पुन्हा हादरले...नशेचे इंजेक्शन देऊन सामूहिक आत्याचार ; पीडितेचा मृत्यू एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. यावेळी संबंधित पीडितेला नशेचे इंजेक्शन देण्यात आले होते. यानंतर आरोपींनी तिला रिक्षातून घरी पाठवले. यानंतर पीडितेचा मृत्यू झाला आहे.
गेसडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मझौली येथील एका महाविद्यालयात पीडित मुलगी अॅडमिशन घेण्यासाठी गेली होती. यावेळी ओळखीच्या काही जणांनी तिला चारचाकीत बसवून घरी नेले. यानंतर मुलीला नशेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर एकामागून एक आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले.
बलरामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी माध्यमांनी दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. पीडिता 29 सप्टेंबरला सकाळी 10 च्या दरम्यान वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमासाठी अॅडमिशन घेण्यासाठी गेल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. मात्र संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सायंकाळी 7 वाजता एका रिक्षातून पीडित मुलगी घरी आली. यावेळी ती जखमी अवस्थेत होती. घरच्यांनी तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर मुलगी वेदेनेने ओरडू लागली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. या दरम्यान तिचा मृत्यू झाला.
विद्यार्थिनी घरी पोहोचल्यानंतर तिचे शरीर चिखलाने माखल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच हातावर ग्लुकोज देण्यासाठी आवश्यक सुई टोचण्यात आली होती. कुटुंबीयांनी अधिक माहितीसाठी प्रयत्न केल्यानंतर गावातील एका मुलाने एका डॉक्टरला उपचारासाठी त्याच्या घरी बोलावल्याची प्राथमिक माहिती आहे.
एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. विमला विक्रम महाविद्यालयातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून परत येताना गावातील 5-6 मुलांनी संबंधित मुलीचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. यानंतर तिला गावातीलच एका घरात नेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रिक्षाने तिला घरी पाठवण्यात आले, त्यामध्ये रक्ताचे डाग असून रस्त्यात तिचा एक सॅन्डलही सापडल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. अत्याचारानंतर संबंधित मुलीला मारहाण झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. कंबरेवर घाव घालून दोन्ही पाय तोडून या युवतीला रिक्षात टाकण्यात आल्याचे ही तिच्या आईने सांगितले आहे. यामुळे घरी आल्यानंतर ही मुलगी काही बोलू शकत नव्हती. ती फक्त वेदनेने ओरडत होती असे तिची आई म्हणाली.
30 सप्टेंबरला संबंधित युवतीचा मृतदेह पोलिसांनी उत्तरिय चाचणीसाठी पाठवला. यानंतर संध्याकाळी उशीरा हा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार पीडितेच्या सर्व शरिरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने तिचा मृत्यू झालाय. यानंतर पीडितेचा अंत्यविधी पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला.
माध्यमांची माहिती चुकीची - पोलीस अधीक्षकांचा दावा
या प्रकरणावर बलरामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी माध्यमांनी दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. माध्यमांनी मुलीचे पाय तोडल्यासंबंधी बातमी दाखवली. मात्र यात तथ्य नसून पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलीच्या आईने तिला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
संबंधित प्रकरणाशी निगडित दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपींची कसून चौकशी होत असल्याचे सांगत याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.