नवी दिल्ली- इटलीच्या मिलान शहरात कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले २१८ भारतीय मायदेशी परतले आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत माहिती दिली. या नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान रविवारी सकाळी दिल्लीला दाखल झाले. या सर्व नागरिकांना भारत आणि तिबेटच्या सीमेवर असणाऱ्या छावला कँम्पमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
शुक्रवारी नागरी-उड्डाण मंत्रालयाच्या सह-सचिव रुबीना अली यांनी मिलानमधील भारतीयांना आणण्यासाठी विमान पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, काल (शनिवार) एअर इंडियाचे एक विमान इटलीला रवाना झाले होते. इटलीमधील सर्व नागरिकांना मायदेशी आणण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. तरीही, कोणी विद्यार्थी मागे राहिल्यास इटलीमधील दूतावासाशी ते संपर्क साधू शकतात, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते दम्मू रवी यांनी दिली होती.