हैदराबाद - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आता भारतात देखील आपले जाळे झपाट्याने विस्तारले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. यामध्ये हातावर पोट असलेल्या कामगारांनी पायीच घराची वाट धरली आहे. तेलंगाणामधील भद्राचलम येथे एका 21 वर्षीय स्थलांतरीत कामगाराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
रखरखत्या उन्हात तब्बल 300 कि.मी. पायपीट, स्थलांतरीत मजुराचा उष्माघाताने मृत्यू
तेलंगाणामधील भद्राचलम येथे एका 21 वर्षीय स्थलांतरीत कामगाराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. त्वचा आणि तोंड कोरडे पडल्याने उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हैदराबाद येथून तीन मित्र ओडिशातील मलकनगिरी येथे आपल्या घरी पायीच निघाले होते. मात्र, भर उन्हात चालल्यामुळे तीघांपैकी एकाच्या छातीत दुखायला लागले आणि तो रस्त्यात कोसळला. लागलीच मित्रांनी पोलिसांना कळवले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्वचा आणि तोंड कोरडे पडल्याने उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली असून मृतदेह मलकनगिरी येथे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर आ वासून उभा राहिला. परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजुर आपल्या घराचं ओढीनं पायीच मैलोनमैल प्रवास करत आहेत.