नवी दिल्ली -देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर पडली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्याचा निकाल दिला होता. त्यावर आज पुन्हा निर्णय देत पटियाला न्यायालयाने आरोपींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. गुरुवारी आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी न्यायालयाकडे 1 फेब्रुवारी या फाशीच्या तारखेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
दिल्ली तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार, एकाच प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींना शिक्षा निश्चित झाल्यानंतर आणि त्यांचे सुटकेचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतरच सर्वांना फाशीची शिक्षा देता येते. यामधील एकाही आरोपीबाबत निर्णय बाकी असेल, तर इतरांनाही फाशी देता येत नाही. या नियमाचा हवाला देत, सिंह यांनी एक फेब्रुवारीला होणाऱ्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती.