चेन्नई - तामिळनाडूत बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना राज्यातील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी गावाजवळ घडली. अपघातग्रस्त बस केरळ राज्य परिवहन विभागाची आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथून केरळमधील एर्नाकूलम येथे जात असताना बसचा अपघात झाला.
केरळ परिवहन विभागाच्या बसचा तामिळनाडूत भीषण अपघात मृतांना तिरुपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्वांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश मुख्यंमत्री कार्यालयाने पलक्कडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तिरूपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकार मिळून मदत कार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. तसेच मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
केरळ राज्याचे परिवहन मंत्री ए. के सशिद्रंन म्हणाले की, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिवहन महामंडळाचे संचालक याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत. तसे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.