चंदीगढ -विधानसभा निवडणुकांना अवघे नऊ दिवस राहिले असताना हरियाणा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हरियाणामधील दोन काँग्रेस नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते तरुण भंडारी आणि संतोष शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर खट्टर यांनी ट्विट करत या दोघांचे अभिनंदन केले आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांत केलेला विकास पाहून तुम्ही हा योग्य निर्णय घेतला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन; असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप त्या लोकांचे नेहमीच स्वागत करते ज्यांना देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पक्षात सहभागी व्हायचे आहे, असेही खट्टर म्हणाले. पंचकुला नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष असेलेले भंडारी यांचे शहरात मोठे नाव आहे. तर, संतोष शर्मा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ऐन विधानसभेच्या तोंडावर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला नक्कीच फायदा होणार आहे.
हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : पंतप्रधानांच्या पुतणीची पर्स हिसकावून पळालेले चोरटे सीसीटीव्हीत कैद