नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
तर आत्तापर्यंत 4 लाख 49 हजार 810 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. काल दिवसभरात 35 हजार 852 नागरिकांची चाचणी घेण्यात आली. यातील 29 हजार 776 नमुने आयसीएमआरच्या 201 लॅबमध्ये तपासण्यात आले. तर उर्वरित 6 हजार 76 चाचण्या 86 खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरचे आर. गंगाखेडकर यांनी दिली.