जयपूर - येथील नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये मंगळवारी रुद्र नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्यावर ४ जूनपासून उपचार सुरू असल्याचे सुत्रांकडून कळते.
नाहरगडच्या बायोलॉजिकल पार्कमध्ये १८ महिन्यांच्या वाघाचा मृत्यू
नाहरगड बायोलॉजिकल पार्कमधील लोकप्रिय अशा रुद्र नामक वाघाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर माहिती कळेल असे सांगण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कमधील एका १८ महिन्यांच्या वाघाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. या वाघाचे नाव रुद्र असे असून तो वन्यप्रेमींमध्ये बराच लोकप्रिय होता. गेल्या काही दिवसांपासून तो शारीरिक आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर ४ जूनपासून उपचार सुरू होते मात्र, मंगळवारी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमागचे कारण सध्या अस्पष्ट असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खरे कारण कळू शकणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रुद्र' हा त्याच्या कुटुंबातील एकमेव सदस्य होता जो बचावला होता. त्याच्या कुटुंबातील इतर वाघांचा काही काही काळापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच, नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये गेल्या वर्षी तीन वाघांचा मृत्यू झाला होता. हे तीनही वाघ रुद्रच्याच कुटुंबातील असल्याचेही सांगण्यात येत आहे.