नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलनाला गालबोट लागले आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकर्यांप्रती एकता व्यक्त करण्यासाठी काँग्रेसह 16 विरोधी पक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह 16 विरोधी पक्ष येत्या 29 जानेवरीला अध्यक्ष राम नाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहेत. याविरोधी पक्षामध्ये बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश नाही.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण देतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती भाषण देतात. परंपरेप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या भावी योजनांचा आणि आधीच्या कामकाजाचा आढावा घेतील. या अभिभाषणात पहिल्यांदाच दोन्ही सदनाचे सदस्य 'सेंट्रल हॉल'ऐवजी लोकसभा आणि राज्यसभेतच बसतील.