जम्मू - येथील चट्टा परिसरातून एक १४ वर्षीय मुलगा आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्याबाबत कुटुंबियांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी रात्री या मुलाचा त्याच्याच घराजवळील परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतहेद आढळून आला. या प्रकरणी संतप्त कुटुंबियांनी सोमवारी आंदोलन करत निषेध नोंदविला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रितीक असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
माहितीनुसार, रितीकचे कुटुंब शहराच्या बाहेरील चट्टा परिसरात राहतात. १९ मे ला ९ व्या वर्गात शिकणारा रितीक त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांचे शोधकार्य सुरू होते. मात्र, एक आठवडा होत आला असतानाही रितीकचा थांगपत्ता लागत नव्हता. अशातच, रविवारी रात्रीच्या वेळेस रितीकचा मृतदेह त्याच्याच घरानजीकच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी शासकीय मेडीकल कॉलेज येथे सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठलला. त्यानंतर, सोमवारी रितीकचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.