रांची - रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) शुक्रवारी रांची रेल्वेस्थानकातून 14 मुलींची सुटका केली. या मुलींना लातेहारवरून हैदराबादला नेण्यात येत होते. यासंदर्भात एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
आरपीएफने केली 14 मुलींची सुटका; एका महिलेला अटक - रेल्वे संरक्षण दल बातम्या
रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रांची रेल्वेस्थानकातून 14 मुलींची सुटका केली. या मुलींना लातेहारवरून हैदराबादला नेण्यात येत होते. यासंदर्भात मीना देवीला अटक करण्यात आली असून सर्व 14 मुलींना पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) रांची स्टेशनच्या प्रवेशद्वारावर एक महिला व काही मुली संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यानंतर आरपीएफची टीम अधिक सावध झाली. आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांनी या मुलींना कुठे जात आहे, असे विचारले असता या मुली उत्तर देऊ शकल्या नाही. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे या महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ही माहिती नन्हे फरिश्ते या मोहिमेतील अधिकाऱ्यांना दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता तिर्की आणि त्यांच्या टीमने या मुलींची चौकशी केल्यानंतर आम्ही लातेहार जिल्ह्यातील असून मीना देवी (25) नावाची महिला त्यांना शिवणकाम प्रशिक्षणासाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. मीना देवी ही चामा निहारी गावची रहिवासी असून शिलाई प्रशिक्षणविषयी तिला विचारले असता ती कुठल्या संस्थेचे नाव सांगू शकली नाही. या संदर्भात मीना देवीला अटक करण्यात आली असून सर्व 14 मुलींना पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या मुलींना हैदराबादला कोणाकडे नेण्यात येत होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.