जयपूर -गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा कारागृहातील 119 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजस्थानमधील सर्वाधिक संक्रमित जिल्हा म्हणून जयपूरची नोंद झाली असून शहरात 551 सक्रिय कोरोना प्रकरणे आहेत.
एका कैद्यांमुळे कारागृहात कोरोनाचा प्रसार झाला आहे. चार दिवसांपूर्वीच एका कैद्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर कारागृहात नवीन प्रकरणे नोंदली गेली. एका आरोपीला 13 एप्रिल ला बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी तुरूंगात पाठविण्यात आले. मात्र, तरुंगात ठेवण्यापूर्वी त्याला 21 दिवस क्वांरटाईन करण्यात आले होते.
त्यानंतर त्याला कैद्यांसह मुख्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले. तो 3 ते 9 मे पर्यंत इतर कैद्यांसोबत राहिला. मात्र, काही दिवसानंतर त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने चाचणी केल्यावर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. कारागृहातील निरोगी कैद्यांना संक्रमितांपासून वेगळे केले आहे. तसेच 55 वर्षांवरील कैद्यांना रुग्णालयात हलवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी कारागृह अधीक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जयपूर येथे शनिवारी 131 कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यामध्ये कारागृहातील 119 कैद्यांचा समावेश आहे. तर राज्यभरातून 213 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदविली गेली. त्यामुळे एकूणच कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 960 वर पोहचला आहे. राज्यात महामारीमुळे आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू झाला आहे.