तिरुवअनंतपुरम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये अडकलेल्या ११२ फ्रेंच नागरिकांना मायदेशी रवाना करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना फ्रान्सला पाठवण्यात आले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा बंद केली आहे. तसेच देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रान्सहून भारतात आलेले पर्यटक केरळमध्येच अडकले होते. या नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी एअर इंडियाने विशेष विमानाची सोय केली होती. बंगळुरूहून निघालेले हे विशेष विमान शनिवारी सकाळी केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाले. तेथून फ्रेंच नागरिकांना घेऊन ते फ्रान्सला रवाना झाले आहे.