जयपूर -राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात रविवारी (९ ऑगस्ट) पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नातेवाईक आणि गुंडांकडून त्रास होत असल्याचे लक्ष्मी नामक पीडित महिला सांगत आहे. सुमारे दीड तासाचा हा व्हिडिओ असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
पाकिस्तानात धार्मिक अत्याचाराच्या भीतीने २०१५ साली आम्ही भारतात आलो. मात्र, येथे आल्यानंतर काही गुंडांनी आणि आमच्या नातेवाईकांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये लक्ष्मी नामक महिलेने म्हटले आहे. भारतामध्येही आम्हाला त्रास सहन करावा लागेल याची कल्पना नव्हती. नातेवाईकांच्या आग्रहानंतर आम्ही भारतात आलो. त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली. आमच्या कुटुंबातील प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते, असा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेचाही मृत्यू झालेला आहे.