भोपाळ - मध्य प्रदेशात असणाऱ्या शहडोल जिल्ह्यातील एका गावावर शोककळा पसरली आहे. कारण, या एकाच गावातील ११ कामगार आज सकाळी महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत पावले होते. रेल्वे रुळांवर झोपलेल्या या कामगारांना भरधाव मालगाडीने चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाने तातडीने या लोकांची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. दुपारपर्यंत यामधील ११ लोकांची ओळख पटवण्यात यश आले, आणि हे सर्व एकाच गावात राहत असल्याची माहिती समोर आली. जनपद तालुक्यातील जयसिंहनगरजवळच्या अंतौली आणि बैरिहा टोला या गावांतील हे सर्व रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदारही या गावाकडे रवाना झाले. तिथे पोहचून त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे आणि जवळपास सर्व गावकऱ्यांचे सांत्वन केले.