नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज (शनिवारी) मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी अनेक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्तर-पूर्वी जिल्ह्यातील बाबरपूर विधानसभा मतदारसंघात चक्क 108 वर्षांच्या आजीबाईने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सीतारा जैन (वय 108) असे या आजीबाईचे नाव आहे.
बाबरपूर येथील महाविद्यालयाच्या शाळेत पोलिंग स्टेशन येथे या आजीबाईने मतदान केले. यावेळी त्यांनी अनेक लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. मतदानस्थळी पोहोचल्यानंतर येथील संपूर्ण निवडणूक टीमने त्यांचे स्वागत केले. तर यावेळी निवडणुकीत अनेक बाबी प्रकर्षाने पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अनेक वृद्ध आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. तर तेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे.