नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात १०२ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत बुधवारी माहिती दिली. ११ जानेवारीपर्यंत ही संख्या ९६वर होती, त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये सहा नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू..
या सर्व रुग्णांना त्या-त्या राज्यांच्या सरकारने स्वतंत्र खोल्यांमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना आणि संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच, प्रवासादरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
आतापर्यंत १५ देशांमध्ये प्रसार..
या नव्या स्ट्रेनबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, परदेशातून आलेल्या लोकांची चाचणी घेण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत या विषाणूचा नवा स्ट्रेन ब्रिटन आणि भारताव्यतिरिक्त डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनन आणि सिंगापूरमध्येही आढळून आला आहे.
नवा विषाणू अधिक संसर्गजन्य..
ब्रिटनमध्ये आढळलेले कोरोनाचे हे नवे विकसीत रुप अधिक संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी १४ डिसेंबरला कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनची पुष्टी केली होती. त्यानंतर जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, कित्येक देशांनी इंग्लंडहून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत.
हेही वाचा :कोविशिल्ड लसीचा पहिल्या टप्प्यातील साठा पोहोचला गोव्यात