नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो अडकलेले परप्रांतीय कामगार आपल्या मूळ राज्यात जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या घरी पोहोचण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या चालवल्या आहेत. याच अनुषंगाने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट केले आहे.
'स्थलांतरीत कामगारांसाठी चालवल्या 1 हजार 34 रेल्वे गाड्या'
स्थलांतरीत कामगारांना घरी परत आणण्यासाठी आतापर्यंत 1,034 मजुरांच्या विशेष गाड्या चालवल्या गेल्या आहेत. त्यापैकी काल 106 गाड्या धावल्या आहेत, अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
उत्तर प्रदेश आणि बिहारने या दिशेने अतिशय वेगवान पावले उचलली आहेत. देशात चालवल्या जाणाऱ्या एकूण कामगार विशेष गाड्यांपैकी जवळपास 80 टक्के गाड्या या दोन राज्यांद्वारे चालवल्या आहेत, असे टि्वट गोयल यांनी केले आहे.
औरेया, उत्तर प्रदेशात अपघाताच्या घटनांनी मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत मारल्या गेलेल्या प्रवासी मजुरांच्या कुटूंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मजूर ट्रकमधून घरी जात आहेत. हे धोकादायक आहे. कामगारांसाठी विशेष गाड्या सोडण्याची राज्यांनी परवानगी द्यावी, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत, अशी विनंती मी सर्व राज्यांना करतो, असेही गोयल यांनी टि्वट करून म्हटले आहे.