नवी दिल्ली Bharat Name History : देशाचं 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याच्या चर्चा सध्या देशभरात सुरू आहेत. 'इंडिया' आणि 'भारत' या दोन्ही नावांचा राज्यघटनेच्या कलम १ मध्ये आधीच समावेश आहे. तसेच, 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया', 'इंडियन रेल्वे' यांसारख्याच्या पर्यायी नावांमध्ये आधीपासूनच 'भारत' असा उल्लेख आहे.
फक्त 'भारत' नाव ठेवण्याची जनहित याचिका फेटाळली : जून २०२० मध्ये, सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून फक्त 'भारत' ठेवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली होती. 'असं केल्यानं देशातील नागरिकांची वसाहतवादी भूतकाळातून सुटका होईल', असं या याचिकेत म्हटलं होतं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं 'इंडियाला घटनेत आधीच भारत म्हटलं आहे', अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे प्रश्न पडतो की हे 'भारत' नाव आलं कुठून?
'भारत' नावाचा इतिहास : 'भारत', 'भरत' किंवा 'भारतवर्षा'ची मुळं पौराणिक साहित्यात आणि महाभारतात आढळतात. पुराणात भारताचं वर्णन 'दक्षिणेत महासागर आणि उत्तरेला बर्फाचा डोंगर यामधील भूमी' असं आहे. दुसरी एक मूळ कथा भारत नावाचा संबंध महान सम्राट 'भरत' यांच्याशी जोडते. त्यांनी 'भरत वंशा'ची स्थापना केली होती. महाभारतानुसार, राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा सम्राट भरत यांनी वैदिक युगाच्या उत्तरार्धात एका विशाल प्रदेशाला एकत्र जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भरत हे ऋग्वेदिक वंशाचे पूर्वज होते. तपशिलात सांगायचं तर ते भारतीय उपखंडातील सर्व लोकांचे पूर्वज होते. त्यांच्या सन्मानार्थ या भूमीला 'भारतवर्ष' असं नाव देण्यात आलं.
'भारत' हा शब्द ऋग्वेदात सापडतो : आणखी एका मान्यतेनुसार, हिंदू पौराणिक कथांमध्ये 'भारत' हा शब्द ऋग्वेदात सापडतो. विशेषत: सातव्या ग्रंथातील १८ व्या स्तोत्रात जे 'दशराग्य' किंवा दहा राजांच्या युद्धाचं वर्णन आहे, त्यामध्ये हा उल्लेख आहे. पंजाबमधल्या रावी नदीजवळील भागात ही लढाई झाली. भरत जमातीच्या राजा सुदाससाठी हा एक महत्त्वाचा विजय होता. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, संपूर्ण इतिहासात ही भूमी 'भारत', 'भरत' आणि 'हिंदुस्थान' यासह अनेक नावांनी ओळखली जाते.
हेही वाचा :Demand Of Team Bharat : खेळाडूंच्या जर्सीवर 'टीम इंडिया'ऐवजी 'टीम भारत' लिहिण्याची वीरेंद्र सेहवागची मागणी
'भारत' आणि 'हिंदुस्थान' : असं मानलं जातं की, 'हिंदुस्थान' हे नाव संस्कृत शब्द 'सिंधू' च्या पर्शियन भाषेतील उच्चारावरुन आलं आहे. पर्शियन (आजचं इराण) भाषेत 'स' चा उच्चार 'ह' असा केला जातो. त्यामुळे 'सिंधू' या नावाचा उच्चार 'हिंदू' असा झाला. सिंधू नदीच्या पलीकडील जमीन म्हणून भारताला 'हिंदूस्थान' असं म्हटलं जाऊ लागलं. इ.स.पूर्व तिसर्या शतकात मॅसेडोनियन राजा अलेक्झांडरनं भारतावर आक्रमण केलं. तोपर्यंत 'इंडिया'ची ओळख सिंधूच्या पलीकडील भूमी अशीच होती.
मुघलांच्या काळात 'हिंदूस्थान' म्हणून उल्लेख : मुघलांच्या सुरुवातीच्या काळात (१६ वं शतक), संपूर्ण इंडो-गंगेच्या मैदानाचा उल्लेख करण्यासाठी 'हिंदुस्थान' हे नाव वापरलं जात असे. इतिहासकार इयान जे. बॅरो, त्यांच्या 'फ्रॉम हिंदुस्तान टू इंडिया: नेमिंग चेंज इन चेंजिंग नेम' (जर्नल ऑफ साउथ एशियन स्टडीज, २००३) या लेखात लिहितात की, 'अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धात, हिंदुस्थानचा उल्लेख अनेकदा झाला. यात दक्षिण आशियाचा बहुतेक भाग समाविष्ट होता. मात्र १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून, ब्रिटिश नकाशांवर 'भारत' हे नाव अधिकाधिक वापरलं जाऊ लागलं.
घटनेत 'इंडिया' आणि 'भारत' कसं आलं : १७ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेच्या चर्चेदरम्यान 'संघाचे नाव आणि प्रदेश' यावर चर्चा सुरू झाली. 'इंडिया, म्हणजेच भारत, राज्यांचा संघ असेल' असं पहिल्या कलमात म्हटल्या गेलं. मात्र यावर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. असे अनेक सदस्य होते जे 'इंडिया' नावाच्या वापराच्या विरोधात होते. त्यांनी हे वसाहतवादी भूतकाळाची आठवण देते, असं म्हटलं. मग राजकारणी आणि संविधान सभेचे सदस्य हरी विष्णू कामथ यांनी सुचवलं की, 'भारत, किंवा इंग्रजी भाषेत इंडिया' असं लिहावं. त्यांनी तसा प्रस्ताव मांडला. 'परदेशात भारताला इंडिया म्हणूनही ओळखलं जातं', असं ते म्हणाले.
इंडिया, वसाहतवादी वारसा? : खरं तर ब्रिटीश वसाहत काळात 'इंडिया' नावाला महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. तथापि, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, या नावाला राष्ट्रवाद्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी याकडे वसाहतवाद्यांनी लादलेलं नाव म्हणून पाहिलं. ते आजही हेच मत ठेवतात.
हेही वाचा :President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित