गुवाहाटी (आसाम) FIR on Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचताच वादाला सुरुवात झालीय. राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर 'सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री' असल्याचा आरोप केलाय. तोच दुसरीकडं आसाम पोलिसांनी भारत जोडो न्याय यात्रेविरोधात एफआयआर दाखल केलाय. आसाम पोलिसांनी त्यांच्यावर प्रवासाचा मार्ग सोडून दुसरा मार्ग अवलंबल्याचा आरोप केलाय. यात्रा मार्गाचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारत जोडो न्याय यात्रा आणि त्याचे आयोजक के. बी. बायजू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर काँग्रेसनं आसाम सरकारवर हल्लाबोल करत यात्रा उधळल्याचा आरोप केलाय.
का दाखल झाला गुन्हा : गुरुवारी दुपारी भारत जोडो न्याय यात्रा जोरहाट शहरातून गेली तेव्हा यात्रेच्या आयोजकांनी नियोजित मार्गावरुन न जाता दुसरा मार्ग स्वीकारला, असं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी पुढं सांगितलं की, यात्रेच्या मार्गात अचानक बदल केल्यानं व्यत्यय निर्माण झाला. तसंच के बी बायजू आणि इतरांसह आयोजकांनी गर्दीला ट्रॅफिक बॅरिकेड्स तोडण्यासाठी आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी भडकवलं, असाही आरोप करण्यात येतोय.