हैदराबाद- कोरोना लस आता नाकाद्वारे घेण्यासही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंट्रानसल (नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या) लसीच्या चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. कंपनीने आज यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. पोलिओ लसीप्रमाणे कोरोनाची लस नाकाद्वारे घेण्यासाठी भारत बायोटेक कंपनी प्रयत्न करत आहे.
वॉशिंग्टन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसन सोबत सहकार्य
भारत बायोटेक कंपनी आधीपासून कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस तयार करत आहे. मात्र, आता नसल कोविड व्हॅक्सिनवर कंपनीने काम सुरू केले आहे. या लसीच्या विकासासाठी कंपनीने वॉशिंग्टन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसनसोबत मिळून काम सुरू केले आहे. नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे क्लिनिकल चाचणी आधीच्या सर्व प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या असून क्लिनिकल ट्रायलची तयारी आता सुरू आहे. प्राथमिक चाचण्या भारत आणि अमेरिकेत घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. आता लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारत बायोटेकच्या लसीवर शंका -
केंद्र सरकारने नुकतेच आणीबाणीच्या परिस्थितीत भारत बायोटेक आणि सीरम कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसींना परवाना दिला आहे. मात्र, भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातील लसींची चाचण्या पूर्ण झाल्या नसून या लसीला परवानगी द्यायला नको, असा सुरू विरोधकांमधून उमटला होता. मात्र, भारत बायोटेकने हा दावा खोडून काढला. आम्हाल लस निर्मितीत दांडगा अनुभव असून आम्ही तयार केलेली लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले. सीरम कंपनीनेही भारत बायोटेकच्या लसीवर अप्रत्यक्ष टीका केली होती.