महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर भगतसिंह कोश्यारींचा माध्यमांनाच खोचक प्रश्न, म्हणाले... - उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निरीक्षणे नोंदवली आहेत. यात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मी त्यांना तुम्ही राजीनामा देऊ नका असे सांगू का, असा खोचक सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यम प्रतिनिधींना केला.

Bhagat Singh Koshyari on SC
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : May 12, 2023, 7:48 AM IST

Updated : May 12, 2023, 8:01 AM IST

नवी दिल्ली :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. त्या निरीक्षणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बहुमत चाचणीला बोलावण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी खातरजमा न करताच उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे पत्र दिले. त्यामुळे राज्यपालांच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले असतानाच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मी त्यांना तुम्ही राजीनामा देऊ नका, असे सांगू का, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला.

सर्वोच्च न्यायालयाने काय नोंदवले निरीक्षण :महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास पत्र दिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा निर्णय औचित्यपूर्ण नव्हता, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ठोस कारण नव्हते, असेही न्यायालयाच्या निरीक्षणात नोंदवण्यात आले आहे. राज्यपालांना राजकीय क्षेत्रात उतरण्याचा अधिकार नाही. पक्षांतर्गत वादात भूमिका बजावण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी :सर्वोच्च न्यायालयाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ठपका ठेवल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना याबाबत विचारले. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी चांगलाच पलटवार केला. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. जेव्हा कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला, तेव्हा मी काय म्हणेन, राजीनामा देऊ नका, असा खोचक सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य हे पाहणे माझे काम नाही. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल योग्य की अयोग्य हे पाहणे तुम्हा लोकांचे काम आहे, विश्लेषकांचे काम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी केले भगतसिंह कोश्यारींचे समर्थन :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालनाने नोंदवलेल्या निरिक्षणानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन केले आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर गुरुवारी आपले निरीक्षण नोंदवले आहे.

Last Updated : May 12, 2023, 8:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details