बंगळुरू :मतदारांची वैयक्तिक माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याच्या चिलुमे संघटनेच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र बंगळुरू शहरात मतदारांची वैयक्तिक माहिती उमेदवारांना विकल्याचे आणखी प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे बंगळुरू शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी याबाबतची माहितीबाबत गोपनियता ठेवण्यासाठी पोलिसांनी कंपनीचे नाव उघड केले नसल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
केवळ 25 हजारात विकली माहिती :निवडणुकीतील उमेदवारांनी 25 हजार रुपये भरल्यास कंपनी त्या मतदारसंघातील मतदारांची माहिती देत होती. लाखो मतदारांची माहिती अवघ्या 25 हजारांना विकणार असल्याचे सांगणाऱ्या अज्ञात वेबसाइट आणि अॅप कंपनीविरुद्ध दक्षिण पूर्व विभागाच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कंपनी मतदारांची संपूर्ण माहिती गोळा करत होती. नंतर स्वतंत्र अॅप वापरून मतदाराची माहिती, नाव, पत्ता, जात, मतदाराने गेल्या वेळी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला आणि यावेळी कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याची माहिती संबंधित उमेदवारांना पुरवल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
वेबसाईटवरच टाकले मतदारांचे मोबाईल क्रमांक :मतदारांची माहिती विकणाऱ्या या कंपनीने आपल्या वेबसाईटवरच मतदारांचे मोबईल क्रमांक टाकेल होते. केवळ २५ हजार रुपये भरल्यास उमेदवाराला लॉगिन आयडी देण्यात येत होता. सुमारे 6 लाख मतदारांची माहिती या कंपनीकडे असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही मतदार यादी विशिष्ट मतदार संघाची आहे की दुसऱ्या मतदार संघाची माहिती आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.