बंगळुरू : भाजप नेते रमेश जारकीहोळी यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने पाच जणांना अटक केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक सौमेंधू मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती.
व्हिडिओमधील महिलेच्या संपर्कात असणारा व्यक्ती ताब्यात..
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांना ज्या व्यक्तीने ही सीडी दिली होती त्या व्यक्तीला या पथकाने अटक केली आहे. यासोबतच विजयनगर आणि चिकमंगळूर भागातून दोघांना अटक करण्यात आली आहे. या पथकाने सांगितले, की आज अटक करण्यात आलेली व्यक्ती ही या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या सतत संपर्कात होती. जेव्हा माध्यमांमध्ये या सीडीबाबत बातम्या येऊ लागल्या, तेव्हापासून या व्यक्तीने आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. ही व्यक्ती आणि महिला वेगवेगळे सिम कार्ड वापरुन एकमेकांच्या संपर्कात राहत होते.