बेंगळुरू Bomb Threat Message : बेंगळुरूमधील 15 शाळांना एकाच वेळी बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळालीय. ही धमकी या शाळांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलीय. शहरातील बसवेश्वरनगरमधील नॅशनल आणि विद्याशिल्पा तसंच येलहंका परिसरात असलेल्या इतर खासगी शाळांसह सातहून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तत्काळ सावधगिरीचा उपाय म्हणून धमक्या मिळालेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत तपास सुरू केलाय. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या एका प्ले स्कूललाही बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. या प्रकरणातील सर्व शाळांचा शोध पोलीस घेत आहेत. शाळांध्ये अद्याप काहीही सापडलं नाही. हा फेक कॉल असल्याचे दिसत असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बॉम्ब निकामी करणारं पथकाकडून शाळेच्या परिसराची पाहणी : गेल्या वर्षी देखील, बंगळुरूमधील अनेक शाळांना अशाच ईमेल धमक्या आल्या होत्या. परंतु, त्या सर्व अफवा ठरल्या होत्या. शाळेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी त्यांचा मेल तपासण्यासाठी त्यांचं ईमेल खातं उघडलं तेव्हा ही धमकी समोर आलीय. याप्रकरणी बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितलं की, बॉम्ब निकामी करणारं पथक शाळेच्या परिसराची पाहणी करत आहे. बॉम्बची धमकी मिळालेल्या शाळांपैकी एका शाळेनं सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना घरी परत पाठवलं जात असल्याचं सांगितलं. याप्रकारामुळं बंगळुरूसह कर्नाटकात एकच खळबळ उडालीय.