नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जेएनयू, जामिया, डीयू आणि आंबेडकर विद्यापीठात गदारोळ झाला होता. कॉलेज प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यानंतरही डाव्या विद्यार्थी संघटनेने बीबीसीची माहितीपट दाखवण्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर केला. जेएनयूमध्ये दगडफेक झाली तेव्हा डीयूमध्ये कलम 144 लागू करण्यात आले.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा:या सगळ्या घटनांदरम्यान बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहावा की नाही यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, भारत सरकारने बीबीसीच्या या माहितीपटावर बंदी घातली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये हिंदू सेनेने बीबीसीला देशाच्या अखंडतेला धोका असल्याचे म्हटले असून बीबीसीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच युट्युबवरून हा माहितीपट हटवला आहे.
बीबीसी कार्यालयाबाहेर लावले फलक : बीबीसीच्या निषेधार्थ कनॉट प्लेस येथील कस्तुरबा गांधी मार्गावरील बीबीसी कार्यालयाबाहेर हिंदू सेनेने फलक लावला आहे. बीबीसी पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करणे थांबवा, असे या फलकावर लिहिले आहे. बीबीसी भारत सोडा, असेही लिहिले आहे. हा फलक याठिकाणी लावण्यात आल्यानंतर एवढा निषेध करण्याजोगे त्या माहितीपटात काय आहे, अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. काही जण तर डॉक्युमेंटरीची लिंक मिळाली तर बघायलाही आवडेल, असे सांगताना आढळून आले.